मुंबई : महाराष्ट्र राज्याचे मा.जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांची कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी मुंबई येथे सदिच्छा भेट घेऊन विविध सामाजिक, कामगार व राजकीय विषयांवर सविस्तर चर्चा केली.
या भेटीदरम्यान महाराष्ट्रातील कामगारांवर लागू होत असलेल्या नव्या श्रम संहितेचे परिणाम, कामगारांच्या हक्कांचे संरक्षण तसेच राज्यातील शेतकऱ्यांसमोरील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. कामगार व शेतकरी यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
यावेळी वाळवा-ईश्वरपूर परिसरात जयंतराव पाटील यांचा राजकीय दबदबा कायम असल्याचेही अधोरेखित करण्यात आले. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उल्लेखनीय यश संपादन केले. जिल्हा परिषद निवडणुकीत 12 पैकी 9 जागांवर विजय मिळवत विरोधकांवर मात करण्यात आली, तर पंचायत समितीच्या 22 पैकी 16 जागांवर विजय मिळवून पक्षाची ताकद सिद्ध करण्यात आली. या उल्लेखनीय यशाबद्दल कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी जयंतराव पाटील यांचे अभिनंदन केले.यावेळी मनपा सदस्य राजू बिराजदार, कष्टकरी महासंघाचे उपाध्यक्ष राजेश माने,संघटक लाला राठोड उपस्थित होते.
दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे राज्यात मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. ही हानी अतिशय मोठी असून या दुःखद काळात कोणताही उत्सव साजरा करणे योग्य ठरणार नाही, असे मत व्यक्त करत जयंतराव पाटील यांनी 16 तारखेला येणारा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तसेच कार्यकर्ते व नागरिकांनी वाढदिवसानिमित्त बॅनर किंवा शुभेच्छा फलक लावू नयेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
