पिंपरी चिंचवड (सलीम सय्यद) : हिरकणी मावळे रायडर्स यांच्या वतीने पुणे–तुळजापूर–अक्कलकोट अशी सलग ३८० किलोमीटर अंतराची अवघड सायकल मोहीम दि. २४ व २५ जानेवारी रोजी यशस्वीरित्या पार पडली. या मोहिमेत एकूण दहा सायकलस्वार सहभागी झाले होते.
या मोहिमेत सहभागी झालेल्या पाच महिला सायकलस्वारांचा चिंचवड येथील श्री स्वामी समर्थ गजानन महाराज मंदिरात शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. मंदिराचे विश्वस्त श्री. गजाननराव चिंचवडे यांचे हस्ते हा सन्मान सोहळा पार पडला.
या वेळी सौ. प्रज्ञा अजगर, सौ. अपर्णा अष्टीकर, सोनाली कदम, सौ. शेटे व मकरंद नरोडे उपस्थित होते.
ही मोहीम अतिशय अवघड असून ती यशस्वीरित्या पूर्ण केल्याचा आम्हाला अतिशय आनंद आहे, असे सत्काराला उत्तर देताना सौ. प्रज्ञा अजगर यांनी सांगितले. तसेच मोहिमेदरम्यान सोनाली कदम यांच्या सायकलचे गिअर तुटले असतानाही त्यांनी कोणतीही मदत न घेता संपूर्ण मोहीम पूर्ण केली, याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.
या सत्कार समारंभास ‘वुई टुगेदर’ संस्थेचे अध्यक्ष मधुकर बच्चे, सचिव जयंत कुलकर्णी, उपाध्यक्ष रविंद्र काळे, खुशाल दुसाने, सहचिटणीस मंगला डोळे सपकाळे, खजिनदार दिलीप चक्रे, महिला समन्वय अध्यक्ष अपर्णा कुलकर्णी, श्रीरंग दाते, श्रीनिवास जोशी, सुरेंद्र जगताप, धनंजय मांडके, सरिता कुलकर्णी, अर्जुन पाटोळे तसेच विख्यात कायदेतज्ज्ञ विलास कडेकर उपस्थित होते.
