पिंपळे सौदागर येथील श्री.मुंजोबा महाराज उत्सवानिमित्त जंगी कुस्त्यांचा आखाडा व मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

 


पिंपरी चिंचवड : पिंपळे सौदागर  येथील प्रतिवर्षाप्रमाणे  ग्रामदैवत श्री मुंजोबा महाराज उत्सव शनिवार दि. १८ एप्रिल ते रविवार दि. १९ या दरम्यान दोन दिवस आयोजित करण्यात  आला आहे. या उत्सवासाठी प्रख्यात नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या  मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून शनिवार दि. १८ रोजी सायंकाळी पिंपळे सौदागर पोलिस चौकी जवळील  गावजत्रेच्या मैदानावर " नादापुढे सर्व बाद " हा तिच्या सांस्कृतिक मनोरंजनाचा बहारदार कार्यक्रम सादर होणार आहे. शनिवारी पहाटे सहा वाजता मुंजोबा महाराज यांना अभिषेक आणि महापुजेने उत्सवास प्रारंभ केला जाणार आहे. त्यानंतर सकाळी  ८ ते १० यावेळेत गावातील सर्व मंदिरांमध्ये पान फुल अर्पण केले जाणार आहेत. दुपारी ११ ते २ यावेळेत विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ, सत्यभामा भजनी मंडळ, ज्ञानाई भजनी मंडळ आणि गुरुमाऊली भजनी मंडळाच्या वतीने भक्तीगीतांचा जागर केला जाणार आहे.

 सायंकाळी पाच वाजता मुंजोबा महाराज पालखी सोहळा असून त्यानंतर गौतमी पाटीलचा मनोरंजनाचा  कार्यक्रम सादर होईल. उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी १९ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता जंगी  कुस्त्यांच्या आखाड्याचे आयोजन करण्यात आले आहे.महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ व पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने पिंपरी चिंचवड शहरात  ग्रामदैवत श्री मुंजोबा महाराज उत्सवानिमित्त पहिल्यांदाच मॅटवरील भव्य आखाडा विविध वजनी गटात होणार असून मानाचा श्री मुंजोबा महाराज केसरी किताब देण्यात येणार आहे.

या आखाड्यात बाल गट ( १४ वर्षाखालील),कुमार गट (१७ वर्ष खालील),व वरिष्ठ गटाची स्पर्धा होतील.पिंपरी चिंचवड शहर पातळीवर तसेच पुणे जिल्हा पातळीवर व  वरिष्ठ गटाची स्पर्धा ही राज्यस्तरीय असेल .तरी शहरातील व महाराष्ट्रातील सर्व पैलवान मंडळीनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन मा.विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक श्री.विठ्ठल उर्फ नाना काटे आणि उत्सव कमिटीचे अध्यक्ष श्री संतोष मल्हारी काटे यांनी  केले आहे.

थोडे नवीन जरा जुने