पिंपरी-चिंचवड शहरातील फुगेवाडी, दापोडी, काळेवाडी व परिसरात विषारी दारू सेवनामुळे १३ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी व संतापजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे मृतांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण शहरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत पोलिस आयुक्त पिंपरी चिंचवड यांना निवेदन देण्यात आले.
सदर घटना ही केवळ दुर्घटना नसून अवैध दारू निर्मिती, साठवणूक व विक्री करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांच्या बेकायदेशीर कृत्यांचा थेट परिणाम आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही खालील मागण्या करीत आहोत.
आमच्या प्रमुख मागण्या :
१) या संपूर्ण प्रकरणाची सखोल, निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करून विषारी दारूच्या उत्पादनापासून विक्रीपर्यंतच्या संपूर्ण साखळीचा पर्दाफाश करावा.
२) या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी.
३) शहरातील अवैध दारू विक्री व हातभट्ट्यांना अभय देणाऱ्या, दुर्लक्ष करणाऱ्या अथवा कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची स्वतंत्र चौकशी करून त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करावी.
४) मृतांच्या कुटुंबीयांना शासनामार्फत तात्काळ आर्थिक मदत व पुनर्वसन सहाय्य मिळावे यासाठी शासनाकडे शिफारस करावी.
५) पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व अवैध दारू अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या समन्वयाने विशेष संयुक्त धाडसत्र व स्टिंग ऑपरेशन राबवावे.
६) नागरिकांच्या जीविताशी संबंधित हा अत्यंत गंभीर विषय असून भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी नियमित गस्त, धाडी व प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात.
या प्रकरणाकडे अत्यंत गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी सचिन चिखले मनसे शहराध्यक्ष, पिंपरी-चिंचवड शहर यांनी पोलिस आयुक्त यांच्याकडे केली आहे. निवेदन देतेवेळी उपस्थित पदाधिकारी राजू साळवे - उपशहर अध्यक्ष, चंद्रकांत भाऊ दानवले, रुपेश पटेकर - सचिव, विनोद भंडारी - शहर संघटक, अॅलेक्स अप्पा मोझस - उप विभाग अध्यक्ष, सागर भोकरे, मनोज महाजन, पर्वेश शेख - शहर संघटक आदी पदाधिकारी उपस्थित होते.
