पुणे, पिंपरी चिंचवड शहरात विषारी दारू पिल्याने अनेकांचा मृत्यू, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे निषेध आंदोलन.


सत्ताधारी भाजप नेत्यांच्या दबावामुळे पोलीस प्रशासन निष्क्रिय. - सुनिल गव्हाणे

पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे शहरात विषारी मद्य प्राशन केल्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे शहरात एकाच वेळी दुःखाची आणि संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सत्ताधारी भाजप पक्ष सत्ताधारी आमदार आणि पोलीस प्रशासन यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह तयार झाले आहेत. या सगळ्या च्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहर शाखेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काल दापोडी येथे निषेध आंदोलन केले. या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. 

तसेच यासंदर्भात पिंपरी चिंचवड अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहरातील पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. पोलीस प्रशासनाचा गलथान कारभार त्यांच्या निदर्शनास आणून दिला. या प्रकरणाशी संबंधित सर्वांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. 

यावेळी बोलताना विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे म्हणाले की, अशा प्रकारच्या घटना घडणे हे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात प्रशासनाचे नियंत्रण राहिलेले नाही.भारतीय जनता पक्षाचे स्थानिक आमदार आणि नेतेमंडळी यांच्याकडून अशा प्रकारच्या अवैध्य धंद्यांना अभय मिळत आहे की काय अशी शंका निर्माण होते. त्यांच्याकडूनच स्थानिक प्रशासनावर दबाव आणून हे सगळे राजरोसपणे सुरू ठेवले जात आहे अशी शंका घ्यायला जागा आहे.

गेल्या काही महिन्यांपासून पुणे, पिंपरी चिंचवड आणि इतर महाराष्ट्रात ज्या प्रकारे चुकीच्या घटना घडत आहेत त्याकडे पाहता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे पूर्णतः अपयशी ठरले आहेत. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. 

यावेळी युवक शहराध्यक्ष इमरान शेख म्हणाले की, आजची घटना घडलेली दुर्दैवी असून अशा घटना पूर्वी बिहार किंवा उत्तर प्रदेश यासारख्या ठिकाणी आपल्याला ऐकायला पाहायला मिळायच्या. भाजपच्या या सरकारने आणि प्रामुख्याने गृहमंत्री फडणवीस यांच्या नाकर्तेपणाचा कळस असा झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराची अवस्था आज बिहार सारख्या बिमारु राज्यासारखी झाली आहे.

यावेळी कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे म्हणाले की,  सर्वांसामान्य जनता महागाई मध्ये होरपळली जात आहे.  अशावेळी कुटुंबप्रमुख हा विषारी दारू मुळे मृत्युमुखी पडत असेल तर संपूर्ण कुटुंब उध्वस्त होते . शासनाच्या दुर्लक्षामुळेच अशा घटना घडत असतात याला संपूर्णतः शासन जबाबदार आहे. सरकारने मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मदत केली पाहिजे.


यावेळी महिला शहराध्यक्ष ज्योती निंबाळकर म्हणाल्या की, आज पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटी म्हणून त्याची ओळख आहे आणि या स्मार्ट सिटीला गालबोट लागावे अशी निंदनीय घटना  शहरात केवळ प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे घडलेली आहे. दारूच्या आहारी गेलेल्या तरुणांमुळे कुटुंबाला अनेक संकटांना सामोरे जावे लागते.  अशातच कर्त्या पुरुषांचा विषारी दारू पिण्यामुळे मृत्यू झाल्यावर परिवारावर खूप मोठे संकट उभे राहिले आहे. याला प्रशासन जबाबदार आहे.

यावेळी सामाजिक न्याय शहराध्यक्ष मयुर जाधव म्हणाले की, स्थानिक पोलीस आणि एक्साईज (उत्पादन शुल्क) विभागाच्या डोळ्यादेखत हे अवैध अड्डे चालत होते. त्यामुळे केवळ हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन नको, तर त्यांची कडक चौकशी व्हावी. मृत व्यक्ती हे घरातील कमावते कष्टकरी होते. सरकारने या गरीब कुटुंबांना तातडीने भरीव आर्थिक मदत जाहीर करावी. आमचा प्रशासनाला थेट इशारा आहे—केवळ दुर्घटना घडल्यावर दोन दिवस कारवाईचे नाटक करू नका. पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील प्रत्येक अवैध दारूचा अड्डा कायमचा उद्ध्वस्त झाला पाहिजे, नाहीतर आम्ही जनतेला सोबत घेऊन रस्त्यावर उतरू.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, युवक शहराध्यक्ष इमरान शेख, महिला शहराध्यक्ष ज्योती निंबाळकर, कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे, वरिष्ठ उपाध्यक्ष काशिनाथ जगताप, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष मयूर जाधव, कल्पनाताई घाडगे,  युवक विधानसभा अध्यक्ष ॲड. संतोष शिंदे सरचिटणीस रजनीकांत गायकवाड, वसीम पठाण, विद्यार्थी विधानसभा अध्यक्ष रिषभ भाडाळे, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आप्पा गायकवाड,  नाभिक समाज महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजू वाळुंजकर, दीपक साळवी, बबलू चखाले, सामाजिक कार्यकर्ते, मेहबूब शेख काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब मुकुटमल, सुहास देशमुख व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने