MGID Header Code
Code End

“दुर्घटना झाल्यावर जागे होणार का?” वेलींनी गुदमरलेल्या ट्रान्सफॉर्मरवरून प्रशासनाला जाब!

कृष्णानगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मारुती गणपत जाधव आक्रमक; महावितरण व उद्यान विभागाच्या कारभाराचा बॅनर लावून निषेध

पिंपरी चिंचवड : कृष्णानगर येथील सचिन गृह संकुल, सेंट अँन स्कूलच्या शेजारील ट्रान्सफॉर्मरची अवस्था पाहून हा ट्रान्सफॉर्मर आहे की बगीचा? असा संतप्त सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मारुती गणपत जाधव यांनी प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून ट्रान्सफॉर्मरभोवती वेलींचे साम्राज्य निर्माण झाले असून, संपूर्ण विद्युत यंत्रणा वेलींनी अक्षरशः झाकून टाकली आहे. धोकादायक परिस्थिती निर्माण होऊनही महावितरण आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या उद्यान विभागाला याची दखल घेण्यासाठी मोठी दुर्घटना घडण्याचीच वाट पाहावी लागणार आहे का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे, अवघ्या ५० मीटर अंतरावर भाजप नगरसेविकेचे कार्यालय असतानाही या गंभीर समस्येकडे डोळेझाक का केली जात आहे? नागरिकांच्या सुरक्षिततेपेक्षा राजकीय सोयी महत्त्वाच्या आहेत का, असा सवालही आता उपस्थित होत आहे.

शाळेच्या अगदी शेजारी धोकादायक ट्रान्सफॉर्मर!

या परिसरात सेंट अँन स्कूल असल्याने दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक आणि नागरिकांची ये-जा असते. अशा ठिकाणी विद्युत ट्रान्सफॉर्मर वेलींनी पूर्णपणे वेढलेला असणे ही केवळ निष्काळजीपणाची बाब नसून नागरिकांच्या जीविताशी खेळण्याचा प्रकार असल्याचा आरोप मारुती गणपत जाधव यांनी केला आहे.

“बिजलीनगरसारखी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का?” “करंट उतरून एखाद्या निष्पाप नागरिकाचा किंवा विद्यार्थ्याचा जीव गेल्यावर जबाबदारी कोण घेणार?”

“दुर्घटनेची वाट पाहत बसले आहे का प्रशासन?”

असे थेट सवाल करत जाधव यांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे.

बॅनर लावून थेट इशारा!

प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मारुती गणपत जाधव यांनी घटनास्थळी “ट्रान्सफॉर्मर आहे की बगीचा?” अशा आशयाचा मोठा बॅनर लावून महावितरण व महापालिका उद्यान विभागाच्या दुर्लक्षाचा निषेध केला आहे.

त्यांनी मागणी केली आहे की, ट्रान्सफॉर्मरवरील सर्व वेली तात्काळ हटवाव्यात, परिसराची साफसफाई करावी, विद्युत यंत्रणेची सुरक्षितता तपासावी आणि भविष्यात अशा घटना घडणार नाहीत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी.

“प्रशासनाने आता तरी जागे व्हावे. दुर्घटना होण्यापूर्वी उपाययोजना करा; दुर्घटनेनंतर पंचनामा करण्याची वेळ येऊ देऊ नका!” असा स्पष्ट इशारा मारुती गणपत जाधव यांनी दिला आहे.

 नागरिकांचा सवाल एकच — “दुर्घटना होण्याची वाट का पाहताय?”

थोडे नवीन जरा जुने