!-- afp header code starts here --> नवनिर्वाचित नगरसेवक तुषार सहाणे यांचा सन्मान कार्यक्रम; अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर सन्मान नाकारत आदरांजली

नवनिर्वाचित नगरसेवक तुषार सहाणे यांचा सन्मान कार्यक्रम; अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर सन्मान नाकारत आदरांजली

 


पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) : पिंपरी–चिंचवड महानगरपालिका प्रभाग क्र. ८ मधून प्रचंड बहुमताने निवडून आलेले नवनिर्वाचित नगरसेवक श्री.तुषार सहाणे यांचा सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने छोटेखानी सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला होता. मात्र श्री.अजित पवार यांच्या अकस्मित निधनाच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर तुषार भाऊंनी सन्मान स्वीकारण्यास नम्र नकार देत उपस्थितांसह श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी कार्यक्रमस्थळी भावूक वातावरण निर्माण झाले होते.

उपस्थित मान्यवरांनी या प्रसंगी शोकभावना व्यक्त करत तुषार भाऊ सहाणे यांना पुढील सामाजिक व विकासात्मक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

संघर्षातून उभे राहिलेले नेतृत्व

सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या तुषार भाऊ सहाणे यांचा जीवनप्रवास प्रेरणादायी मानला जातो. आळे (ता. जुन्नर) या मुळगावातून इंद्रायणी नगर, भोसरीपर्यंतचा त्यांचा प्रवास कष्ट, जिद्द आणि प्रामाणिकपणावर आधारलेला आहे. वडिलांच्या अकाली निधनानंतर आलेल्या प्रतिकूल परिस्थितीत आईच्या आधाराने आणि स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी आपली वाट निर्माण केली.

उद्योजक म्हणून त्यांनी “भूषण इंजिटेक अँड हँगर्स इंडिया प्रा. लि.” हा उद्योग उभारला असून या माध्यमातून अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. उद्योगासोबत समाजकार्याची जाण जपत त्यांनी नागरिकांशी जवळीक निर्माण केली आहे.

जेजुरी मार्तंड देव संस्थानात सदस्य ते अध्यक्ष असा त्यांचा प्रवास राहिला असून, पारदर्शक, शिस्तबद्ध आणि लोकहितकारी कारभारामुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. कृतीप्रधान आणि सेवाभावी नेतृत्व म्हणून ते परिसरात ओळखले जातात.

मान्यवरांची उपस्थिती

सन्मान समारंभात सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ या मानवाधिकार संस्थेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.त्यामध्ये महाराष्ट्र राज्य अध्यक्ष किशोर थोरात, जनरल सेक्रेटरी पुणे शहर रविंद्र आळणे, उपाध्यक्ष पुणे जिल्हा भगवान वायकर तसेच राजकुमार भागवत,सुहास शेलार,संदीप पवार,संदीप राठोड,अभिजित दिवाणे,अवधूत वळसे,आबासाहेब आहेर,शारदा नारोन्हा,आफ्रिन सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश कुंभारे, राष्ट्रीय उपाध्यक्ष तेजस परमार व पश्चिम भारत अध्यक्ष अमोल माने यांनीही तुषार भाऊ सहाणे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

सेवाभावाची भूमिका अधोरेखित

सन्मान न स्वीकारता प्रथम आदरांजली अर्पण करण्याचा निर्णय घेतल्याने तुषार भाऊ सहाणे यांच्या संवेदनशील आणि मूल्यनिष्ठ भूमिकेची उपस्थितांनी दखल घेतली. प्रभागातील विकास, उद्योजकता आणि जनसेवा यासाठी त्यांची पुढील वाटचाल अधिक प्रभावी ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

थोडे नवीन जरा जुने