MGID Header Code
Code End

PCMC: ज्येष्ठांचा आनंदोत्सव व प्रेरणादायी सन्मान सोहळा उत्साहात संपन्न



पिंपरी चिंचवड (शिवानंद चौगुले) : ओम शांती गंगा ज्येष्ठ नागरिक संघ, महात्मा फुले नगर, चिंचवड यांच्या वतीने आयोजित मासिक अभिष्टचिंतन सोहळा व विशेष सन्मान कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. हा कार्यक्रम केवळ औपचारिक न राहता आपुलकी, स्नेह, संस्कार व आनंद यांचे जिवंत दर्शन घडवणारा ठरला.

या प्रसंगी डिसेंबर २०२५ व जानेवारी २०२६ महिन्यात वाढदिवस असलेल्या संघातील ज्येष्ठ सदस्यांचे औक्षण, ओवाळणी व पेढे भरून पारंपरिक पद्धतीने वाढदिवस साजरे करण्यात आले. मोठ्या संख्येने उपस्थित सभासद व कुटुंबीयांमुळे संपूर्ण वातावरण कौटुंबिक व आनंदमय झाले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष श्री. यशवंत कण्हेरे होते. प्रास्ताविकात त्यांनी “ज्येष्ठांचे आयुष्य निरोगी, दीर्घायुषी व आनंदी असावे,” अशी सद्भावना व्यक्त केली. महिला सभासदांनी प्रेमपूर्वक औक्षण करून ज्येष्ठांचा सन्मान केला; हा क्षण उपस्थितांच्या मनाला स्पर्श करून गेला.

याच वेळी जानेवारी २०२६ मध्ये संघात नव्याने दाखल झालेल्या सदस्यांचे पुष्प व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. नव्या सदस्यांच्या सहभागामुळे संघकार्याला नवी ऊर्जा मिळेल, अशी भावना व्यक्त करण्यात आली.


कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ७२ व्या वर्षीही À+ ग्रेड मोरोशी भैरवगड ट्रेक यशस्वीरीत्या पूर्ण करणारे श्री. विश्वास भालचंद्र सोहनी यांचा सन्मान. ओम शांती गंगा ज्येष्ठ नागरिक संघ व श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान यांच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

सन्मान स्वीकारताना श्री. सोहनी यांनी ट्रेकिंगमधील अनुभव सांगत शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्थैर्य, शिस्त व सकारात्मक दृष्टिकोन या आयुष्यभर उपयोगी ठरणाऱ्या मूल्यांवर प्रकाश टाकला. यावेळी त्यांच्या सौ. वंदना सोहनी यांनीही मनोगत व्यक्त करून कुटुंबाच्या पाठिंब्याचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाच्या शेवटी उत्सवमूर्तींच्या वतीने दिनेश पाटील यांनी आभार मानले, तर  शिवानंद चौगुले यांनी कार्यक्रमाची सांगता केली.

हा सोहळा ज्येष्ठ नागरिकही उत्साहाने, सन्मानाने व प्रेरणादायी जीवन जगू शकतात याचे उत्तम उदाहरण ठरला.

थोडे नवीन जरा जुने