पुणे (सलीम सय्यद) : खडकी येथील सेंट्रल आर्मर्ड फायटिंग व्हेईकल डेपो (CAFVD) या संरक्षण खात्यातील रणगाडा डेपोमध्ये सेवेत असलेले ज्येष्ठ कामगार नेते फेरोज सय्यद हे ४० वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३१ जानेवारी रोजी सेवानिवृत्त झाले.
फेरोज सय्यद हे गेल्या ३० वर्षांपासून संरक्षण खात्यात कार्यरत असलेल्या MTSSD Workers’ Union मध्ये विविध पदांवर सक्रिय होते. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त युनियनच्या प्रशस्त हॉलमध्ये सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित कामगारांनी त्यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशनचे खजिनदार श्री. मोहन होळ यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “फेरोज सय्यद यांच्यासारखा नेता होणे दुर्मिळ आहे.” युनियनचे संस्थापक श्री. बी. के. बोकील, श्री. प्रकाश गोडसे, के. अंडीअप्पन आणि मोहन होळ यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांचे त्यांना त्यांच्या कार्यकाळात मोलाचे मार्गदर्शन लाभले.
सय्यद यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक कामगारांचे प्रश्न यशस्वीपणे सोडवले. इंग्रजी भाषेवर त्यांचे उत्तम प्रभुत्व होते तसेच कामगारांच्या समस्यांचा सखोल अभ्यास त्यांनी केला होता. अनेक महिला कामगारांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच वैद्यकीय परिपूर्तीशी संबंधित अनेक प्रकरणे त्यांनी यशस्वीरीत्या हाताळून कामगारांना त्यांचे हक्काचे पैसे मिळवून दिले. इन्कम टॅक्स संदर्भातील अनेक बाबींमध्येही त्यांनी कामगारांना मोलाची मदत केली.
त्यांच्या सेवानिवृत्तीमुळे युनियनच्या कामकाजाचा सखोल अभ्यास असणाऱ्या एका उत्कृष्ट नेत्याची उणीव पुढील काळात युनियनला नक्कीच भासणार आहे. सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी महिन्यातून थोडा वेळ आपल्या प्रिय कामगारांसाठी द्यावा, अशी विनंती यावेळी सर्व कामगारांनी केली.

