वीज कर्मचाऱ्यांनी सुरक्षेला प्राधान्य देत सुरक्षा साधनांचा वापर केलाच पाहिजे - राजेंद्र पवार

 


महावितरण पुणे परिमंडलातील वीज कर्मचाऱ्यांना संचालक राजेंद्र पवार यांच्या हस्ते सुरक्षा साधनांचे वाटप

पुणे, दि. ७ ऑगस्ट २०२६: विजेची कामे करताना वीज कर्मचाऱ्यांना मोठी जोखीम पत्करावी लागते. यासाठी महावितरण प्रशासनाने अत्याधुनिक सुरक्षा साधने उपलब्ध करून दिली असून, प्रत्येक कर्मचाऱ्याने या साधनांचा वापर करणे बंधनकारक आहे. कारण कर्मचारी हाच कंपनीचा खरा कणा असून, त्याच्या सुरक्षिततेची काळजी कंपनी आणि कुटुंबाला सारखीच आहे, असे प्रतिपादन महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी आज पुण्यात केले.

गणेशखिंड येथील प्रकाशभवन सभागृहात शुक्रवारी (दि. ७) संचालक (मासं) राजेंद्र पवार यांनी मानव संसाधन विभागाची आढावा बैठक घेतली. या बैठकीदरम्यान पुणे परिमंडलातील वीज कर्मचाऱ्यांना विविध प्रकारच्या अत्याधुनिक सुरक्षा साधनांचे वाटप करण्यात आले.


यावेळी महावितरणचे मुख्य अभियंता सुनील काकडे, अधीक्षक अभियंते ज्ञानदेव पडळकर, सिंहाजीराव गायकवाड, सुरेश सवाईराम, विजयानंद काळे, सहायक महाव्यवस्थापक सत्यजित राजेशिर्के, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भूपेंद्र वाघमारे, समन्वयक डॉ . संतोष पटणी यांच्यासह परिमंडळातील सर्व कार्यकारी अभियंते, मानव संसाधन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना संचालक राजेंद्र पवार म्हणाले, "एखादे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी कितीही दबाव असला तरी सुरक्षेच्या नियमांना कधीही बगल देऊ नका. वीज कोणालाच क्षमा करत नाही, त्यामुळे प्रत्येक कामात सुरक्षा साधनांचा वापर अत्यंत आवश्यक आहे."

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन, उत्तम सुविधा आणि कल्याणकारी योजना राबवून त्यांची काळजी घेते. याच भावनेतून कर्मचाऱ्यांनीदेखील ग्राहकांची काळजी घ्यावी, त्यांना तत्पर सेवा द्यावी, ग्राहकांशी संवाद साधताना गोड बोलावे आणि व्यसनांपासून दूर राहावे. कर्मचाऱ्यांच्या कामावरच कंपनीची जनमानसांतील प्रतिमा अवलंबून असते, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

यावेळी मुख्य अभियंता सुनील काकडे यांनीदेखील सुरक्षेविषयी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, "यापूर्वी स्थानिक पातळीवर सुरक्षा साधने उपलब्ध केली जात होती, ज्यामध्ये एकसारखेपणा नव्हता. मात्र, आता कंपनीचे मुख्य कार्यालय एकाच वेळी राज्यातील वीज कर्मचाऱ्यांसाठी उत्तम दर्जाची सुरक्षा साधने पुरवत असून, या संपूर्ण प्रक्रियेची नोंद ऑनलाईन प्रणालीत होत आहे.

सुरक्षा कार्यसंस्कृती रुजविण्यासाठी प्रयत्नशील- राजेंद्र पवार

सुरक्षा हा दररोजच्या जीवनात अविभाज्य भाग बनला पाहिजे आणि तशी कार्यसंस्कृती महावितरण मध्ये तयार करण्याचा प्रशासनाचा उद्देश आहे. त्यासाठी वीज कर्मचाऱ्यांनी प्रत्येक आठवड्यात (सोमवारी) कामाची सुरुवात 'सुरक्षा प्रतिज्ञा' घेऊनच करावी असे निर्देश देण्यात आले असून त्याची नोंद ऑनलाईन प्रणालीत फोटोसह घेतली जात आहे. 


थोडे नवीन जरा जुने