पिंपरी चिंचवड : लोकशाही हा शब्द आपण रोज ऐकतो; मात्र लोकशाहीचा खरा अर्थ, नागरिकांचे अधिकार आणि संविधानाने दिलेले स्वातंत्र्य आपण समजून घेणे आवश्यक आहे. योग्य-अयोग्य यावर बोलण्याचा अधिकार आणि आपले मत मांडणाऱ्या प्रत्येकाला निर्भयपणे बोलू देणे, त्याच्या मताशी असहमती असली तरी त्याचा आवाज दडपला जाऊ न देणे, हाच लोकशाहीचा खरा गाभा आहे, असे प्रतिपादन कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केले.
लोकशाही दिनानिमित्त कष्टकरी संघर्ष महासंघ, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ आणि कष्टकरी रिक्षा-टॅक्सी चालक संघर्ष महासंघ यांच्या वतीने चिंचवड येथे भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी लोकशाही मूल्यांचे जतन, संविधानिक अधिकार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर निर्भयपणे आवाज उठविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमास संघटनेचे पदाधिकारी, कामगार, फेरीवाले, रिक्षा-टॅक्सी चालक तसेच कष्टकरी नागरिक उपस्थित होते.
यावेळी नखाते म्हणाले की, अब्राहम लिंकन यांनी लोकशाहीची व्याख्या ‘लोकांनी, लोकांसाठी चालवलेले लोकांचे राज्य’ अशी केली होती. या विचाराचा व्यापक अर्थ समजून घेतला पाहिजे. लोकशाहीमध्ये सत्ता ही केवळ राज्यकर्त्यांची नसून प्रत्येक नागरिकाचा त्यात समान वाटा असतो. त्यामुळे सामान्य नागरिकाने प्रश्न विचारणे, आपल्या समस्या मांडणे आणि व्यवस्थेतील चुकीच्या गोष्टींना विरोध करणे हा त्याचा लोकशाही अधिकार आहे.
भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला समानतेचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे गरीब असो वा श्रीमंत, प्रत्येक नागरिकाच्या मताला समान मूल्य प्राप्त झाले आहे. त्यामुळे समाजातील शेवटच्या घटकाचा आवाजही लोकशाही व्यवस्थेत तितकाच महत्त्वाचा आहे. मतभेद असणे हे लोकशाहीचे लक्षण आहे; मात्र मतभेद व्यक्त करण्यासाठी मोकळे आणि सुरक्षित वातावरण असणे त्याहून महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ आणि प्रसारमाध्यमे हे लोकशाही व्यवस्थेचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. कोणत्याही यंत्रणेचा दबाव न वापरता आपला अधिकार अबाधित राहिला पाहिजे.
आज देशासमोर महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, कामगारांचे प्रश्न, असंघटित क्षेत्रातील कष्टकऱ्यांच्या समस्या तसेच सोशल मीडियावरील खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीचे आव्हान आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी अधिक जागरूक राहून सत्य पडताळणे, निर्भयपणे प्रश्न विचारणे आणि संविधानिक मार्गाने आपल्या हक्कांसाठी आवाज उठविणे आवश्यक आहे. लोकशाही केवळ मतदानापुरती मर्यादित नसून दररोजच्या जीवनात समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा स्वीकार करणे म्हणजे खरी लोकशाही, असे नखाते यांनी नमूद केले.
